कराड दि. (प्रतिनिधी) : शिक्षण मंडळ कराड संचलित एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल कराडमध्ये आषाढी एकादशी निमित्त पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना संतांची, वारकरी संप्रदायाची,पारंपारिक सणाविषयी माहिती व्हावी, समता – बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.स्नेहल वाळिंबे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी पारंपारिक वारकरी पोशाखात होते. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले, टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली.विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही अभंग गायले तर बालचमू विद्यार्थ्यांना यावेळी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगण्यात आले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment