आपला कराड

कराड दक्षिण मतदारसंघात पुन्हा इतिहास घडवूया : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद

कराड : निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होईल. कोणी खोटी आश्वासने देवून निघून जाईल. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या आशीर्वादाने मी खासदार, केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री झालो. हे मी कधीच विसरणार नाही. मिळालेल्या पदाचा उपयोग मी कायम सार्वजनिक विकासासाठी केला. मिळालेल्या पदाला न्याय मिळेल तसेच सर्वसामान्य जनतेला उपयोग व्हावा असेच निर्णय घेतले हे सर्व तुमचीच देण आहे कारण हा संस्कारक्षम आपला विचार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपला बूथ सांभाळावा, व आपला बूथ जिंकावा. राज्यात आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील खूण आहे. मुख्यमंत्री कार्यकाळात 1800 कोटी पेक्षा जास्त निधी आणून मतदार संघाचा धोरनात्मक विकास करता आला. त्यानंतर दुर्दैवाने आमचं सरकार गेलं व भाजपा चे सरकार आले त्यांनी विरोधकांच्या अधिकाराने मिळणाऱ्या निधी त काटछाट करून नवीनच पायंडा पाडला. जो आमच्या सरकार च्या काळात कधीही नव्हता. लोकप्रतिनिधीचे अधिकार अबाधित ठेवण्याचे काम सरकार चे असते. पण तसे नंतर झाले नाही.

पण तरीही एक लोकप्रतिनिधी या नात्याने आमचा अधिकाराचा वापर करीत मतदार संघासाठी निधी आणता आला. पण एक दूरदृष्टी ठेवून केलेला विकास हा शास्वत असतो तो करणे गरजेचे असते. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना असाच मोठा निधी आणता आला. पण नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिंबा लागेल अशा गोष्टी भाजपा ने केल्या आणि पक्ष फोडाफोडी करून असंविधानिक सरकार आणलं. पण यावेळी महाराष्ट्रातील जनता भाजपा ला त्यांची जागा दाखवील्याशिवाय शांत बसणार नाही. आता महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून काँग्रेस पक्ष मुख्य भूमिका बजावेल त्यामुळे सत्ता असताना विकास कसा करता येतो हे आपण 2014 ला पाहिलं आहे आता पुन्हा ती संधी आपल्याला येणार असल्याने कराडचा ऐतिहासिक व धोरनात्मक विकास करण्यासाठी साथ द्या. आणि पुन्हा कराड दक्षिण मतदारसंघात इतिहास घडवूया, असा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, अजितराव पाटील – चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, पैलवान नानासाहेब पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर, प्रदीप जाधव, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, गितांजली थोरात, शंकरराव खबाले, रोहित पाटील, नामदेव पाटील, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे, नितीन थोरात, एकनाथराव तांबवेकर, डॉ. सुधीर जगताप, उदय आबा पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष संभाजी चव्हाण, संचालक नितीन ढापरे, श्रीमती इंदिरा जाधव,सर्जेराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडचा आजचा निर्धार राज्यात पोहचला आहे. ही निवडणूक आणि आजचा निर्धार राज्याच्या भवितव्याकरिता महत्वाचा आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कराड दक्षिण मतदारसंघाने आजपर्यंत जपला आहे. १९९१ साली माझ्यावर कराडकरांनी विश्वास दाखवला. त्यामुळे मला तीनवेळा खासदार होता आले. व मला पंतप्रधान कार्यालयापर्यंत मानाचे काम करता आले. मुख्यमंत्री असताना मला कराड दक्षिणमध्ये 1800 कोटीची विकासकामे करता आली. कराड जिल्हा व्हावा या उद्देशाने आधी ज्या विकासाची व प्रक्रियेची गरज आहे अशी मोठी कामे करता आली जी पूर्ण व्हायला काही वर्ष लागली.

ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात भाजपने द्वेषाचे राजकारण करत सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान केले आहे. आजपर्यंत या लोकांनी आपल्याला छळले आहे. महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. अनेक मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला नेले. हे राज्य सरकारचे अपयश आहे. मुंबईचे आर्थिक विकास केंद्र गुजरातला पळवले. कराड – चिपळूण रेल्वे मार्गाचे सुरेश प्रभूंच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्या प्रकल्पाचा निधी मोदींनी बुलेट ट्रेनला वळवला. यातून मोदी महाराष्ट्राचा द्वेष करत असल्याचे दिसते.
ते म्हणाले, दिल्लीत बसलेले मोदी, शहा व अदानींनी नकळत मुंबई हातात घेतली आहे. मी मुख्यमंत्री असताना पालघर जिल्हा निर्माण केला. त्या जिल्ह्यात होणारी मरीन अकॅडमी मोदींनी द्वारकेला पळवली. त्यावेळेच्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनी त्यांना विरोध केला नाही.

ते म्हणाले, राज्याच्या महायुती सरकारने सरकारी मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत. याबाबत आम्ही आवाज उठवला तर राज्याच्या मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढतो म्हणून सांगितले. आज ती श्वेतपत्रिका कुठे आहे, असा सवाल करत बोगस टेंडर काढून केवळ विकासाची पोस्टरबाजी सुरू आहे. या सर्व प्रकारांची आमचे सरकार आल्यानंतर चौकशी करणार आहे.

ते म्हणाले, ही निवडणूक राज्याच्या भवितव्याची आहे. भाजपचे सरकार आपल्या डोक्यावर घ्यायचे आहे का, पुन्हा वर्णव्यवस्था अंगावर लादून घेणार आहोत का, याचा गांभीर्याने विचार करा. योग्य निर्णय घेतला, तर विकास होतो. याचे उत्तम उदाहरण मलकापूर शहर आहे. विकासाचा द्रोह करणाऱ्या लोकांनी मलकापूरच्या विकासाला विरोध केला होता. यशवंतराव चव्हाण यांनी कराडला विमानतळ आणले. असे सांगून ते पुढे म्हणाले, कराडच्या विकासाच्या व्हिजनमध्ये सहभागी व्हा. दिल्लीमध्ये काम करत असताना मी जग आणि अनेक राज्यांचा विकास जवळून बघितला आहे. त्या विचारातून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, खंडकरी शेतकऱ्यांना शेती परत केली. १०८ रुग्णवाहिका आणली. या योजनांची नावे बदलून त्या भाजपने सुरू ठेवल्या आहेत.

ते म्हणाले, कर्नाटक राज्यात काँग्रेसने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना तर तेलंगणा राज्यात महालक्ष्मी योजना आणली. महाराष्ट्राला एक नंबरवर नेण्याचा आमचा विचार आहे. त्याच विचारातून आमच्या आघाडी सरकारच्या जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवून प्रतीमहा दोन हजार रुपये करणार असून, महिलांना सक्षम करण्याचा आमचा यामागे संकल्प आहे.

अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, देशात प्रचंड महागाई वाढली आहे. जाती – जातीत तेढ निर्माण केला जात आहे. आरक्षणावरून विभागणी केली जात आहे. या सर्व प्रक्रियेतून विशिष्ठ विचाराचे सरकार आणण्याचा डाव आहे. ही परिस्थिती निर्माण करण्यात बिघडवणारी शक्ती काम करत आहे. या प्रतीगामी शक्ती आपल्या – आपल्यात तेढ निर्माण करत आहेत.

ते म्हणाले, विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा यांच्यामध्ये वैचारिक संघर्ष झाला. पण कोणतेही व्यक्तिगत मतभेद नव्हते. या निवडणुकीत रयत संघटनेचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार असून, पृथ्वीराजबाबांचा विजय नक्की आहे. विरोधकांमध्ये सरंजामशाही व भांडवलदारशाही इतकी भिनली आहे की, त्यांना माणसे विकत घ्यायची आहेत. त्यांच्याकडे वाममार्गाने आलेल्या पैशातून सत्ता हवी आहे. त्यांचा काळ्या पैशाचा अभिमान या निवडणुकीत आपल्याला मोडून काढायचा आहे. माझ्याकडे जबाबदारी व वैचारिक वारसा आला आहे. तो निष्ठेने निभावणार आहे. १९५२ सालापासून आजपर्यंतची कराड दक्षिणची काँग्रेसची परंपरा कायम जपूया. संघटनेत बेरीज – वजाबाकी झाली पाहिजे. त्याशिवाय संघटनेस मजबुती येत नाही. या निवडणुकीत आपल्याला पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करायची आहे. राज्यात सत्तांतर नक्की आहे. त्यामध्ये कराड दक्षिणचा मोठा वाटा उचलावा लागणार आहे.

बंडानाना जगताप म्हणाले, विरोधी उमेदवार बाहुलीसारखा आहे. चावी दिली की, हा इकडून तिकडून फिरतो. त्यांची पक्षनिष्ठा तपासावी लागते. रेठऱ्यात यशवंतराव मोहिते यांच्यानंतर कोणीही आमदार होणार नाही. तिथे पण महादेव आमदार आहेत. चौथ्यांदा विरोधी उमेदवार अतुल भोसलेंना पराभूत करुया.

मनोहर शिंदे प्रास्ताविकात म्हणाले, ज्यांना रेठऱ्याचा पूल करता आला नाही. त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. कराड दक्षिणची विधानसभा निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घ्यावी.

भानुदास माळी, बंडानाना जगताप, अधिकराव जगताप, अॅ ड. संभाजीराव मोहिते, वहागावचे सरपंच संग्राम पवार, संदीप उर्फ पिंटू शिंदे, चचेगावचे माजी सरपंच दिलीप पवार, आबा गुरव, आबा सुर्यवंशी, अॅ ड. अमित जाधव, प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.

– शिवराज मोरे म्हणाले, अतुल भोसले यांनी पंढरपूरला कॅनडा सरकारकडून दोन हजार कोटी आणणार, अशी घोषणा केली होती. पाच वर्षे झाली, तरी तो निधी अद्याप आलेला नाही. ही मंडळी कृष्णा ट्रस्टवर पार्किंगचे पैसे सोडत नाहीत. त्या पोस्टर बॉयला पुन्हा पराभूत करायचे आहेत.
– प्रा. धनाजी काटकर म्हणाले, उदयसिंह पाटील हे असे आहेत की, ते सावज टप्प्यात आली की शिकार करतात. ते अतुल भोसलेंची पाठ लावल्याशिवाय राहणार नाहीत.
– अजितराव पाटील – चिखलीकर म्हणाले, विरोधी उमेदवार डॉक्टर आहेत. त्यांना आमचे सांगणे आहे की मी येतो, माझे ऑपरेशन करा. मलकापूरचा विकास काय झाला, हे विचारणाऱ्या विरोधकांनी चषम्याच्या दुकानात जावे. रेठऱ्याचा पूल दुरुस्त करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी साडे सात कोटीचा निधी दिला. याचा विसर त्यांना आहे. मयूर कुक्कटपालन संस्थेची जमीन परत कधी करणार, असे सांगून भोसले पिता – पुत्र भूमाफिया आहेत. असेही त्यांनी सांगितले.
– यावेळी कापील, चचेगाव, आटके व नांदलापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!