कराड :- माझ्या राजकीय कारकिर्दीत कोट्यावधीची विकासकामे करता आली. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 1800 कोटीची विकासकामे केली. विकासकामे सुचविण्याचा अधिकार राज्यघटनेने लोकप्रतिनिधीना दिला आहे. विकास कामाच्या जीवावरच मला लोकांनी दोन वेळा लोकसभेत आणि दोन वेळा विधानसभेत पाठवले. पुन्हा काँग्रेसच्या पाठीशीच कराड दक्षिणची जनता उभी राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील बेलवडे (ता. कराड) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी शिवाजीराव थोरात, पै. नानासो पाटील, नितीन थोरात, जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, भगवान मोहिते, शहाजी मोहिते, माणिकराव मोहिते, भास्करराव मोहिते, धनाजी थोरात, युवक काॅंग्रेसचे देवदास माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव मोहिते म्हणाले, आमच्या गावात 2018 साली मोठ्या शब्दात विरोधकांनी विकासकामांचा बोर्ड लावले. मात्र, आजही ते काम झाले नाही. अॅड. उदयसिंह दादा आणि आ. पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून आम्ही बेलवडे गावातून काॅंग्रेसला मोठे मताधिक्य देवू.
भगवानराव मोहिते म्हणाले, काले जिल्हा परिषद गटात कोणत्याही रस्त्याला खड्डा दिसत नाही. आ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून वाडी- वस्तीवर 100 टक्के रस्ते पूर्ण झाले आहेत. निवडणुकीचा हंगाम आल्याने काहीजण इकडे- तिकडे करत असतील. नेते कुठेही जावू द्या, पण कार्यकर्ते पृथ्वीराज बाबांसोबतच आहेत. आमच्या नेत्यांनी लावलेले बोर्ड हे विकासकामे पूर्ण तसेच वर्कआॅर्डर घेतलेले आहेत. विरोधकांचे बोर्ड हे निवडणुकीत आश्वासन देण्यापुरतेच आहेत.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला कराड दक्षिणच्या जनतेने भरभरून आशिर्वाद दिला. मी मुख्यमंत्री असताना विकासकामे मोठ्या प्रमाणावर आणली. त्यानंतर भाजपाचे 10 वर्ष सरकार असून त्यांनी विकासकामे देताना आडकाठी आणली. परंतु, तरीही मी विकासकामे आणली आणि पूर्ण केली. केवळ निवडणुकीत दाखविण्यासाठी बॅंनरबाजी किंवा नारळ फोडले नाहीत.
बेलवडेत पक्षप्रवेश आणि पाठिंबा
भारतीय किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गेली अनेक वर्ष डाॅ. अतुल भोसले यांच्या सोबत असलेले बेलवडे येथील प्रदीप मोहिते यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तर दिलीप सकटे यांनी पाठिंबा दिला.
Add Comment