राज्य

केईएम शताब्दी समारोह ; केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे ; झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, केईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असते, तशीच भावना केईएम बद्दल आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेनं सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. आज केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरलीये. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत.  अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली.जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी काढले.

भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात १९६८ मध्ये झाली. त्यानंतर २०२४ रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाण्ट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात १९८७ साली डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत.त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्यावतीने आभार मानतो. केईएमचे शताब्दी महोत्सव वर्षे पुढील पिढीसाठी खुप काही देण्यासाठी पायाभरणीचे ठरेल, यात तीळमात्र शंका नाही, असेही ते म्हणाले.

रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!