जिल्हा

चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. १९:  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हाती घेण्यात येणारी कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल प्रशासनाने आवश्यक सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात पार पडलेल्या सातारा जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी ही माहिती दिली.  बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आमदार शशिकांत शिंदे, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, पुणे विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त (नियोजन) संजय मरकळे ,जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात चार मंत्री असून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी व्यतिरिक्त जिल्ह्याच्या विकासाठी विविध विभागांकडून अधिकाधिक निधी आणला जाईल. जलजीवन मिशनच्या कामांना कशी गती देता येईल यादृष्टीने कार्यवाही करावी. वनविभागाच्या हद्दीतील  तलावासाठी १ हेक्टरच्या आतील भूसंपादनासाठी जलसंधारण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

आमदार महोदयांच्या मागणीनुसार साकव पुल बांधणे, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व  माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांसाठी जास्तीचा निधी ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना ६४७ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना ९५ कोटी आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र २ कोटी ८ लाख असा एकूण ७४४ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सांगितले.  जिल्ह्यासाठी २०२४-२५ आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना ५७५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना ९५ कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र १ कोटी ६४ लाख असे एकूण ६७१ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. हा संपूर्ण १०० निधी टक्के खर्च झाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मौजे तळदेव(ता. महाबळेश्वर) येथील तळेश्वर देवस्थान मंदिर, मौजे कळंबे (ता. सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिर, मौजे. आंधळी (ता. माण) येथील सिद्धेश्वर महालक्ष्मी मंदिर, मौजे कवठे (ता. खंडाळा) येथील केदारेश्वर मंदिर या मंदिरांना ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!