जिल्हा

पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५

 

सातारा, दि. 10: पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने, उपविजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. सातारा संघ तृतीय स्थानी राहिला. या विजेत्या संघांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
सातारच्या पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे नेटके नियोजन केले, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही. या स्पर्धेतून राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ बालेवाडी येथे सराव करण्यासाठी पाठवावे. राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाला सर्वसाधारण विजेते पद मिळेल असा विश्वास व्यक्त करुन सर्वांनी यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन केले. ते म्हणाले , महसूल विभागात अनेक गुणवान खेळाडू आहेत. या खेळाडूंनी नागरी सेवा देण्यात आपल्या विभागाचा नावलौकीक वाढवावा. तसेच येणाऱ्या काळात नागरिकांच्या समस्या संवेदनशीलपणे सोडविण्यास प्राधान्यही द्यावे, असेही आवाहन विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. एकत्रित काम केले तर कार्यक्रमाचे चांगले नियोजन करता येते हे यातून दाखवून दिले आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे.
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी पुणे येथे होणार आहे. सातारा महसूल विभागाकडून क्रीडा ध्वजाचे पुणे महसूल विभागाला हस्तांतरण करण्यात आले.
या प्रसंगी सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!