कराड : माझ्याकडे कोणताही पीए नाही मी सर्वसामान्य लोकांशी थेट भेटणारा थेट संपर्कात राहणारा त्यांचे अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदतीसाठी असणारा, तळागाळात काम करणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये मला सर्वसामान्य मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. अनेक जणांनी मला छुपा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये विधानसभा निवडणुकीत चमत्कारिक इतिहास घडेल असा विश्वास स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केला.
कराड येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते आज (बुधवारी) बोलत होते. यावेळी राजू पठाण, राकेश पवार, मनोज बडेकर, अरुण जमाले, शबाना मुल्ला, तात्या पाटील, चंदू नलवडे, अन्सार मुल्ला, संग्राम पाटील, बबलू आंबेकरी, अर्जुन बडेकर यांची उपस्थिती होती.
इंद्रजीत गुजर म्हणाले, माजी खा.राजू शेट्टी, बच्चूभाऊ कडू यांनी माझ्यावर विश्वास दाखवून कराड दक्षिणमधून मला उमेदवारी दिली आहे. कराड दक्षिणमध्ये मतदारांकडून मला चांगला पाठिंबा मिळत आहे. तळागाळात काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये मतदार जरी बाहेर उघड बोलत नसले तरी आतून माझ्या पाठीशी आहेत. कराड दक्षिणमध्ये या निवडणुकीत ऐतिहासिक चमत्कार घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी माजी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव कट्टीबद्ध राहणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न, विजेचा व पाण्याचा प्रश्न या मूलभूत गोष्टीकडे आपले प्राधान्य राहील. तसेच मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपले प्राधान्य राहील. मतदार संघात बाहेरील उद्योग कसे आणता येईल यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू पठाण म्हणाले, गेली वीस वर्ष आपण समाजकारणात व राजकारणात सक्रिय आहे. अनेकांना निवडणुकीत पाठिंबा दिला. परंतु, निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्याला बेदखल केले. इंद्रजीत गुजर हे तळागाळात काम करणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना कराड दक्षिणेत पाठिंबा देत आहोत असे त्यांनी सांगितले. कराड दक्षिणमध्ये शाहू, फुले, आंबेडकर विचाराने काम करणारे नेतृत्व म्हणून आम्ही इंद्रजीत गुजर यांच्याकडे पाहत आहोत. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता असे इंद्रजीत गुजर यांची ओळख आहे. आम्ही संघटनेच्यावतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
Add Comment