जिल्हा

सर्व पेट्रोल पंपानी सुरक्षतेचा अहवाल सादर करावा : जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

सातारा दि. 23 : हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि., इंडियन ऑईल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. या सर्व कंपनीचे सेल्स ऑफीसर यांना सातारा जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपाचे भूमिगत टाकीची तात्काळ तपासणी करून त्यामध्ये पावसाचे पाणी जात नसलेबाबत खातरजमा व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केल्या
इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने सातारा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सेल्स ऑफिसर हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि. शिखर श्रीवास्तव , सेल्स ऑफिसर इंडियन ऑईल कार्पोरेशन लि. मयंक अग्रवाल, सेल्स ऑफिसर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. सुभाष गुप्ता, विपुल शहा, रितेश रावखंडे, प्रदिप सांगावकर, रमेश हलगेकर, प्रकाश पारेख, केदार नाईक यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य हे उपस्थित होते.
सर्व पेट्रोलपंप चालक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्व सेल्स ऑफीसर यांनी पेट्रोलपंप चालक यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे सांगून जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने म्हणाल्या, सद्यस्थितीत इथेनॉल मिश्रित पेट्रोल असल्याने ह्याचा सर्व्हिसिंग करताना, गाडी धूताना किंवा इतर काही कारणास्तव पाण्याशी संपर्क आला तर यामधील इथेनॉल हे पेट्रोल पासून विभक्त होते व ते पाण्यासह गाडीच्या टाकीशी तळाशी साचते व गाडी स्टार्ट करताना किंवा चालवताना त्रास होवू शकतो. प्रत्येक वाहनधारकांनीही वाहनाच्या टाकीतील पेट्रोलचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच याबाबतचे माहीतीचे फलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावावेत.
इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची साठवणूक व हाताळणूक यासाठी आवश्यक मानकानुसार सर्व पेट्रोल पंपावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून घेण्यात याव्यात जेणेकरून वाहनांच्या इंधन क्षमतेवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी सेल्स ऑफीसर, हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि, इंडियन ऑईल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांनी घ्यावी, असे निर्देशही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी दिले.
पावसाळयात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होऊन पंपचालक व वाहनधारक यांचेमध्ये वाद होत आहेत. अशा परिस्थितीत कंपन्याकडून आवश्यक ती खबरदारी घेणेत यावी अशी मागणी सातारा जिल्हा पेट्रोल डिझेल असोशियनच्यावतीने बैठकीत करण्यात आली.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!