पथनाट्य, रांगोळ्या नृत्याद्वारे स्वच्छतेचा संदेश
एक पेड मा के नाम उप्रक्रमात वृक्षारोपण
अहमदनगर – महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर, आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिला. अभिनेत्री कानेटकर, आयुक्त डांगे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. स्वच्छतेवर आधारीत जिंगलचे अनावरण करत अभिनेत्री कानेटकर यांनी त्यावर ठेका धरला. पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेची साद घातली.
अभियानांतर्गत एक पेड मा के नाम वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. यात महाविद्यालय परिसरात २७ झाडे लावण्यात आली. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या गाण्यांवर झुम्बा डान्सद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने हार, बुके, शाल, नारळला फाटा देत रोपे देऊन उपस्थितांचे स्वागत केले. मनपाचे सफाई मित्र व जिंगल गायिका मीनल पेडगावकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
स्वच्छता मोहिमेत न्यू आर्ट्स कॉलेज ते दिल्लीगेट या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वतः अभिनेत्री कानेटकर व आयुक्त डांगे यांनी झाडू हातात घेत स्वच्छता केली. रांगोळीद्वारे स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. एनएसएस, सीएसआरडी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनीही प्रामुख्याने सहभाग नोंदवला. स्वच्छतेबाबतचे विविध संदेश फलक झळकावून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिल्या.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, कोणत्याही शहराची ओळख ही स्वच्छतेतून दिसते. आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहते. महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे. शहरात १८ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीक, विद्यार्थी, पालकांनी स्वच्छता विषयक अडचनींसाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्त डांगे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले
Add Comment