सर्वपक्षीय बैठकीत मागणी; अन्यथा डीपी जैन कंपनीला काम करून देणार नाही
कराड : कराडात कोयना नदीवरील पुलाच्या नवीन कामामध्ये डीपी जैन यांनी नदीत बांध घालून नैसर्गिक जलस्त्रोत बंद केला आहे. नदीच्या पात्रात १०० फुटाची चर काढल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे कराडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धोका निर्माण झाला आहे. पुलाखालून क्रॉस झालेली पाईपलाईनला धक्का बसला आहे. त्यामुळे कराडवर जलसंकट ओढवले आहे. यास सर्वस्वी डीपी जैन कंपनीच जबाबदार आहे. जबाबदारी स्वीकारून डीपी जैन कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.अन्यथा डीपी जैन कंपनीला महामार्गाचे काम करून देणार नाही. असा इशारा आज (गुरुवारी) सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला. तसेच यासंदर्भात उद्या शुक्रवार दि.19 जुलै रोजी महामार्ग रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
कराड नगरपरिषदेच्या सभागृहात आज (गुरुवारी) सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रशासनाच्यावतीने उपविभागीय तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी शंकर खंदारे, उपमुख्याधिकारी सुविधा पाटील, डीपी जैन कंपनीचे प्रतिनिधी बक्षी,महामार्ग प्राधिकरणाचे पाटोळे, बांधकाम अभियंता रत्नाकर गायकवाड, ए.आर.पवार यांची उपस्थिती होती.तर सर्व पक्षाच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सुभाषराव पाटील, जयवंत पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर, हणमंतराव पवार, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, विक्रम पावसकर, माजी नगराध्यक्ष सौ.शारदाताई जाधव, सौ.रोहिणी शिंदे, अल्ताफ शिकलगार,माजी नगरसेवक सौरभ पाटील, अशोकराव पाटील, सौ. स्मिता हुलवान,शिवराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष जितेंद्र डुबल, पोपटराव साळुंखे, मुकुंद चरेगावकर, प्रीतम यादव, रणजीत पाटील, महादेव पवार आदी उपस्थित होते.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडकरांवर पाण्याचे संकट हे महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे झाले आहे त्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ उपाययोजना करावी 24 तासाचे अल्टिमेटम त्यांनी संबंधित डी पी जैन कंपनी आणि महामार्ग अधिकारी यांना दिली. पुढे बोलताना यादव म्हणाले, पुलाचे नवीन काम सुरू केले आहे. या कामामध्ये डीपी जैन यांनी नदीत बांध घालून नैसर्गिक जलस्त्रोत बंद केला आहे. नदीच्या पात्रात १०० फुटाची चर काढल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे कराडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला धोका निर्माण झाला. पुलाखालून क्रॉस झालेली पाईपलाईनला धक्का बसला आहे. त्यामुळे कराडवर पाण्याचे संकट या कंपनीमुळे ओढवले आहे. ऐन पावसाळ्यात केलेल्या या चुकीचा कामाचा फटका संपूर्ण कराड शहराला बसला आहे.
मुळात नैसर्गिक जलस्रोत अडवण्याचा अधिकार कंपनीला आहे का? चुकीच्या कामाचा फटका पाईपलाईनला बसला आहे,आता जुन्या पुलालाही धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कंपनीने भराव काढणे गरजेचे होते,पण तसे कंपनीने केले नाही. त्यामुळेच पाईपलाईनला धोका झाला आहे. याला जबाबदार डीपी जैन कंपनीच आहे. त्यामुळे जबाबदारी स्वीकारून कंपनीने संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्ही गुन्हे दाखल करू असा इशारा राजेंद्रसिंह यादव यांनी दिला.
सध्या जुन्या वॉटर वर्क्समधून कराड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु कराडकरांसाठी हा पर्याय नाही. नागझरीचे अशुद्ध पाणी नदीपात्रात मिसळत आहे. या पाण्यामुळे कराडकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. भराव टाकण्या अगोदरच डीपी जैन कंपनीला नगरपालिका प्रशासनाने नोटीस द्यायला हवी होती. त्यामुळे पालिका प्रशासनही या घटनेला तितकेच जबाबदार आहे. कराडच्या हिताविरोधात अदृश्य शक्ती कार्यरत आहेत. हे कराडकर नागरिक चांगलेच ओळखून आहे. त्यामुळे पाईपलाईन टाकण्याचे काम डीपी जैन कंपनीने तात्काळ चालू करावे. उद्या ११ वाजेपर्यंत हे काम सुरू झाले नाही तर महामार्ग रोको आंदोलन केले जाईल. गावापेक्षा कोणीही मोठा नाही. १६०० कोटीच्या कामात 400 कोटी कंपनी कमावणार आणि झालेले हे नुकसान आम्ही सोसणार हे चालू देणार नाही. असा इशारा यादव यांनी दिला.
सुभाषराव पाटील म्हणाले, डीपी जैन कंपनीने भराव घातल्यामुळेच पाईप लाईनला धोका निर्माण झाला आहे. याची नुकसान भरपाई कंपनीने दिली पाहिजे. ७ जूनला नदीपात्रातील भराव निघणे गरजेचे होते. पण तसे कंपनीने केले नाही. आम्हाला वेटीस धरून काम करणार असाल तर आम्हीही महामार्गाचे काम करून देणार नाही. कंपनीला सांगून पाईपलाईन दुरुस्तीचे काम करून द्यावे, अन्यथा कराडकर नागरिक पाणी प्रश्नासाठी महामार्गावर उतरून काम बंद पडतील असा इशारा त्यांनी दिला.
प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर डीपी जैन कंपनीच्या प्रतिनिधींना सक्त ताकीद देत आत्तापासूनच पुलाचे काम बंद करा अशा सूचना देत, कराड शहराला कंपनीच्या टँकर मार्फत पाणीपुरवठा करावा, नदीपात्रात टाकण्यात आलेला भराव आत्तापासूनच काढायला घ्या, स्थानिक पातळीवरचे विषय डीपी जैन कंपनीने स्थानिक लोकप्रतिनिधीशी चर्चा करून आठ दिवसात सोडवावेत अन्यथा प्रशासनाने हस्तक्षेप केला तर कंपनीला परवडणार नाही असा इशाराही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिला.
कराडकरांची आक्रमक भूमिका आणि प्रशासनाची नरमाई
गेल्या सोमवारपासून कराड शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे कराडकर नागरिक आक्रमक भूमिकेत आहेत. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कराडकर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाबरोबरच डीपी जैन कंपनी व एनएचआय यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी या दोन्ही प्रतिनिधींना सभागृहाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करीत या गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कराडकरांची आक्रमक भूमिका पाहून प्रशासनानेही नरमाईची भूमिका घेत यातून मार्ग काढण्यासाठी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू असे आश्वासन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिले.
Add Comment